पाथर्डी, ता. १८ - ""कष्टकरी, शूर व संस्कृतिप्रिय असलेल्या गोरमाटी बंजारा समाजाने बदलत्या काळाशी एकरूप होऊन परंपरा, संस्कृती, भाषा, वेश व विचार जपावा.
शिक्षणाचा, संपत्तीचा व विचारांचा उपयोग समाज संघटित करण्यासाठी करावा,'' असे आवाहन प्रा. मोतीराज राठोड यांनी केले.
तालुक्यातील कोकीसपीर तांडा येथे पाचव्या राज्यस्तरीय बंजारा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते लालसिंग रजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संयोगिता नाईक (पुणे), प्रा. गोविंद पवार (अंबेजोगाई), अतिरिक्त आयुक्त उत्तम राठोड, रामदास राठोड, रामदास चव्हाण (लातूर), प्रा. दत्ता पवार (नांदेड), मंजूषा राठोड, ऍड. चारुशीला राठोड, गणपत राठोड, गोविंद चव्हाण, गोपीचंद चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. राठोड म्हणाले, ""लमाण समाजाची प्रशासनाकडून उपेक्षा होत आहे. समाजाचे युगपुरुष वसंतराव नाइकांनी तब्बल बारा वर्षे राज्याची धुरा वाहिली. त्या गोरमाटींना आज रस्ता, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य अशा गरजांसाठी भांडावे लागते.'' समाजाचा इतिहास व संस्कृती नष्ट करू पाहणाऱ्या स्वजातीयांबरोबर अन्य विचारांचा मुकाबला आपल्याला संघटितपणे करावा लागेल. सामाजिक व वैचारिक बांधिलकी मानणारे मोजके समाजबांधव बंजारांना नवी दिशा देऊ शकतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
डॉ. गणपत राठोड म्हणाले, ""संत सेवालाल सदन (लातूर) येथे उभारून बंजारा समाजाचे देशव्यापी कार्य तेथून चालावे, यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.''
वक्त्यांनी मेळाव्याचे संयोजक डॉ. गणपत राठोड व विष्णुपंत पवार यांचे कौतुक केले. खास लमाणी वेशातील वयस्कर महिलांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
गणपत राठोड यांनी प्रास्ताविक केले. अरुण पवार यांनी सूत्रसंचालन केले. विष्णुपंत पवार यांनी स्वागत केले. संजय वडते यांनी आभार मानले. उद्या महोत्सवाचा समारोप असून, रात्री भजन मुकाबला व पारंपरिक गाण्यांना बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण रात्र सर्व तांड्यांनी जागून काढली. गोरमाटी भाषेतील विनोद व सर्व कार्यक्रम अन्य भाषकांनाही आवडले.
Refrence
esakal