आजचा सुधारक हे गेली एकोणीस वर्षे नागपुरहून प्रकाशित होते. विवेकवादी विचाराला वाहिलेले चिंतनशील मासिक अशी त्याची थोडक्यात ओळख करुन देता येईल. जात आरक्षण हा तसा संवेनाशिल विषय आहे. याला अनेक पैलू आहेत. तो काळ-पांढर. समर्थन - विरोध, चांगल - वाईट अशा द्विमितीत तो बसवता येणार नाही. पण या विषयाची चर्चा करताना काही संकल्पना पुरेशा स्पष्ट कराव्या लागतात. त्याला व्याख्ये साठी कायद्याच्या चौकटीत बांधाव लागत. मग त्यातुन आपल्याला अनुकुल असे अन्वयार्थ काढणे . एखाद्या इतिहासपुरुषाला वेठीस धरुन आपल्याला वाटणारे अर्थ हे त्या महापुरुषाला अभिप्रेत होते असे सांगुन लोकाश्रय संपादन करणे. सकृतदर्शनी विरोधक वाटणार्या प्रतिमेचे फक्त अनुकुल तेवढेच संदर्भ उधृत करणे. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा हे प्रकार राजकारण असो वा समाजकारण असो यात केले जातात. लोकशाहीतील राजकारण हे केवळ गुंडशाही वर चालणार नाही असे लक्षात आल्यावर अनेक विद्वानांना हाताशी धरुन त्यांच्या करवी बौद्धिक दांडगाई व बौद्धिक कसरती करुन समांतर बौद्धिक दंगली घडवुन आणायच्या हे गोबेल्स चे आधुनिक रुप विवेकवादी विचारश्रेणीचे लोक असहाय्यपणे पहात आहेत. जनतेमध्ये विवेक जागृती करण्याचा प्रयत्न जर त्यांच्या हिताच्या विरोधात असेल तर जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारावजा धमकी हे लोक देत असतात. यासाठी वाचकांनाच विचारी बनवण्याचा प्रयत्न 'आजचा सुधारक' करत असतो. यासाठी मी सर्वसामान्य लोकांना समजतील अशा वस्तुनिष्ठ बाबी आजच्या सुधारक मध्ये याव्यात अशी विनंती मी वेळोवेळी करत असतो. त्यानुसार आजच्या सुधारक मध्ये जात आरक्षण विशेषांकात हे परिशिष्ट संपादकांनी दिले आहे. आजच्या सुधारक बाबत काही माहिती आपल्याला इथे पहाता येईल.
काही संज्ञांचे अर्थ
१. दलित : उच्च जातीच्या पायाखाली तुडवली गेलेली किंवा उद्ध्वस्त झालेली हिंदू जातिव्यवस्थेमधली सर्वांत खालची जात. पूर्वी ह्या जातींना `अस्पृश्य' मानले जायचे. शासनाने ह्या जातींना `अनुसूचित जाती' असे घोषित केले आहे. काही अभ्यासक दलित ह्या शब्दामध्ये - सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या शोषण झालेल्या गटांचा समावेश करतात; उदाहरणार्थ - दलित, आदिवासी, नव-बौद्ध, भूमिहीन, वेठबिगार, स्त्रिया आणि ख्रिश्चन व मुस्लिम
ह्या धर्मांतील अन्याय झालेल्या जाती.
२. शूद्र-अतिशूद्र : शूद्र म्हणजे स्पृश्य मागासलेली जात. हिंदू जातिव्यवस्थेमधला चौथा वर्ण. मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये शूद्र जातीने द्विज जातीची म्हणजे उच्च जातीची सेवा केली पाहिजे असे म्हटले आहे. शूद्रांचे काम म्हणजे कारागिरी, मजुरी, सेवा करणे. अति-शूद्र म्हणजे अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जाती--दलित जाती. हिंदू जातीच्या व्यवस्थेमधील चार वर्णांच्या बाहेर--बहिष्कृत केलेला वर्ण. महात्मा फुल्यांनी `शूद्र-अतिशूद्र' हा शब्द वापरला होता.
३. अस्पृश्य : उच्च जातीने अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींतील लोकांना स्पर्श केल्यास जात बाटते, विटाळ होतो, माणूस अशुद्ध होतो असे मानले जात असे. पूर्वीचे अस्पृश्य म्हणजे सध्याचे दलित.
४. हरिजन : शब्दश: अर्थ - ईश्वराची मुले. महात्मा गांधींनी अस्पृश्यांबद्दल वापरलेला शब्द. काही अभ्यासकांच्या मते हा शब्द अप्रतिष्ठेचा, अपमानकारक आहे, सन्माननीय वाटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीही ह्या शब्दास प्रखर विरोध दर्शविला होता.
५. आदिवासी : शब्दश: अर्थ - मूळ रहिवासी. हे रहिवासी किंवा जमाती जंगलात आणि दऱ्या-खोऱ्यांत राहिल्यामुळे आधुनिक नागरिकीकरणापासून आणि विकासापासून व शिक्षणापासून वंचित राहिल्या.
६. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (Scheduled Castes and Scheduled Tribes - SC/ST) -- अनुसूचित जाती (Scheduled caste) ही काही एक जात नाही, तर अनेक जातींचा गट आहे, ज्यांच्या समस्या एकसारख्या आहेत आणि त्यांवर उपायही सारखेच आहेत. आरक्षणासाठी आणि विशिष्ट अशा काही कायदेशीर बाबींसाठी `अनुसूचित जाती' हे नाव देण्यात
आले आहे. घटनेच्या कलम ३४१ व ३४२ अनुसार केंद्रशासनाने अनुसूचित जाती-जमातींची यादी घोषित केलेली आहे. व्यक्तीची जात या घोषित केलेल्या यादीप्रमाणे असेल तर ती ज्या राज्याची रहिवासी असेल त्या भागासाठी (राज्यासाठी) ती व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीची सदस्य म्हणून गणली जाते. अनुसूचित जातींना हिंदू जातिव्यवस्थेमध्ये चार वर्णांच्या बाहेर ठेवले गेले होते. ह्या जातींना हजारो वर्षे दुर्लक्षित ठेवून दासांची कामे दिल्याने ह्या जाती उन्नत व प्रगत होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. अनुसूचित जातीच्या सदस्यांना उच्च जातींनी केलेल्या शोषणामुळे व अस्पृश्यतेमुळे फार सोसावे लागले.
अनुसूचित जमातींना पूर्वी प्राचीन जमात, जंगल-जमात, पहाडी-जमात म्हणत. नागरीकरणापासून दूर वस्त्या, प्राचीन जीवन-पद्धती, भौगोलिकदृष्ट्या एकाकी, इतर मोठ्या समाजाशी संबंध फार कमी, वेगळी संस्कृती इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. अनुसूचित जमातींना अनुसूचित जातींसारखा उच्च जातीच्या अस्पृश्यतेचा, शोषणाचा आणि भेदभावाचा सामना करावा लागला नाही. अनुसूचित जातींस दलित म्हटले जाते तर अनुसूचित जमातीस आदिवासी म्हटले जाते. हिंदू, शीख व बौद्ध धर्मातील व्यक्तीच फक्त अनुसूचित जातीची असू शकते. अनुसूचित जमातीसाठी असे कुठलेही बंधन नाही. एस.सी./एस.टी.च्या व्यक्तीने इतर जातीतील व्यक्तीशी लग्न केल्यानंतरही त्याची/तिची जात एस.सी/एस.टी.च राहते. एस.सी. आणि इतर जातीतील व्यक्ती यांच्या लग्नातून जन्मलेल्या मुलाची/मुलीची जात, वडिलांची जी जात असेल ती लागू होते. सर्व राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातींची एकूण संख्या १२१५ आहे तर अनुसूचित जमातींची एकूण संख्या ७४७ आहे. महाराष्ट्नत अनुसूचित जातींची संख्या ५९ तर अनुसूचित जमातींची संख्या ४७ आहे.
७. भटक्या जमाती : (Nomadic Tribes - NT) स्वातंत्र्यपूर्व काळापासून उपजीविकेच्या शोधार्थ भटकी प्रवृत्ती असेल्या महाराष्ट्नतील जमातीस भटक्या जमाती म्हटले जाते. गोसावी, गारुडी, घिसाडी, गोंधळी, वंजारी, डोंबारी, वैदू, बहुरूपी, धनगर इ. महाराष्ट्नतील जातींचा यात समावेश होतो. या जातींमध्ये तीन गट पाडले गेले आहेत. भटक्या वंजारी जमातीस २%, भटक्या धनगर व तत्सम जमातीस ३.५%, व उरलेल्या १९९० पूर्वीच्या यादीनुसार
भटक्या जमातीस २.५% आरक्षण आहे.
८. विमुक्त जाती (Denotified Tribes - DT): - १९२४ च्या गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या जाती. बेरड, भामटा, कैकाडी, लमाण, रामोशी, वडार, बंजारा, छप्परबंद इ. १४ जातींचा यात समावेश होतो. यांच्यासाठी ३% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.
९. इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग उरतो, त्यास इतर मागास वर्ग (Other Backward Class - OBC) म्हटले जाते. मंडल आयोगाने ३७४३ इतर मागासवर्गीयांची नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्नीय आयोगाने २१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते. आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा इत्यादी महाराष्ट्नतील अनेक जाती यामध्ये येतात. केंद्रशासनामध्ये या जातीस २७ टक्के तर महाराष्ट्न् राज्यात १९ टक्के आरक्षण आहे.
१०. विशेष मागास वर्ग (एस.बी.सी.) : महाराष्ट्न् राज्यातील अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्ग वगळता सामाजिक, आर्थिक व शैक्षिणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग - यामध्ये गोवारी, कोष्टी, कोळी, व मुन्नेरवार या चार प्रमुख जातींचा यांत समावेश होतो. या वर्गास २ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.
११. पुढारलेल्या जाती (उच्च जाती) : हिंदू जातिव्यवस्थेमध्ये हा समाजगट जातीच्या उतरंडीमध्ये उच्च मानला गेला होता. ह्या उच्च जातींनी धर्माच्या व मनुस्मृती कायद्याच्या नावाखाली आपल्या सेवेसाठी ठरावीक व्यवसाय करायला भाग पाडले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या खालच्या जातींचे शोषण करून उच्च जाती पुढे आल्या - पुढारलेल्या झाल्या. यामध्ये बहुतांश राज्यांत आढळणारी ब्राह्मण जात, महाराष्ट्नतील मराठा जात, व इतर राज्यातील वैश्य, आर्य-वैश्य, जाट, राजपूत, रेड्डी, खत्री, गौडा, अरोड़ा, आगरवाल, नायर, नायडू/कायस्थ, कपू, वेलम्मा, वेल्लास, इ. वर्ग/जाती येतात. पुढारलेल्या जातींची लोकसंख्या १५ ते १९ टक्के या दरम्यान आहे.
१२. सकारात्मक कृती कार्यक्रम - Affirmative Action Programme :
पूर्वी झालेल्या भेदभावाची भरपाई म्हणून सध्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या समाजगटांना शिक्षण, रोजगार आणि सरकारी ठेकेदारीमध्ये प्राधान्य/सवलत देण्याचा कार्यक्रम.
१३. क्रीमी-लेयर (Creamy Layer) : उन्नत-प्रगत व्यक्तींना/समाजगटांना आरक्षणाच्या सवलतीतून वगळण्यासाठी शासनाने ठरवलेला निकष.
सध्या हा निकष ओबीसींना लागू आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नोकरीसाठीच्या आरक्षणासाठी व्यक्तीची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.२.५ लाख, तर राज्यशासनातील आरक्षणासाठी रु.४ लाख ठेवली आहे. हे उत्पन्न सलग तीन वर्षे ह्या मर्यादेपेक्षा कमी असल्यास ती व्यक्ती सवलतीस पात्र होते.
१४. गरिबी रेषा (Poverty Line) : प्रौढ व्यक्ती ग्रामीण भागात दिवसाला २४०० क्रॅलरीज व शहरी भागात २१०० क्रॅलरीज एवढे धान्य मिळण्यास समर्थ असणे. रुपयांमध्ये रूपांतर केल्यास डिसेंबर २००५ मध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्ती महिन्याला ग्रामीण भागात रु. ३६८ व शहरी भागात रु. ५५९ मिळवण्यास समर्थ असल्यास ती गरिबी रेषेच्या काठावर आहे असे समजावे.
जागतिक बँकेची विकसनशील देशांसाठी गरिबी रेषेची व्याख्या आहे ती अशी : व्यक्ती दिवसाला एक डॉलरच्या वर कमवत असल्यास ती गरिबी रेषेच्या वर आहे असे समजावे.
वरीलपैकी एकाही व्याख्येत व्यक्तीच्या इतर आवश्यक गरजांचा (आरोग्य, शिक्षण, घर, कपडे) समावेश केलेला नाही.
Regards,