वीस वरीस मुंबईत कामं केली. मुंबईत कामं करुन थोडे थोडे पैसे जमवून गावी दहा एकर शेतजमीन विकत घेतली. मुंबईत काम मिळालं तिथं राहायचं. तिथलं काम संपलं की दुसरीकडं जायचं, यामुळं पोरांच शिक्षण व्हईना. त्यामुळं या सेवापूर तांड्यावर परत आलोत. पण येथेही अनेक समस्या. सेवापुरात काम नसल्यानं पहिल्यांदा हातावरची शिलाई शिकले. मग शिलाई मशीन घेतली. सामानासाठी पैसा जमा करण्यासाठी म्हणून वडवळ नागनाथच्या बँकेत खातं काढले. कुटुंबाची जबाबदारी माझी. मला पतीचा पाठिंबा. बँकेत महिलांच्या भेटी होत. एकदा बँकेत ममता कुलकर्णी बाईकडून बचत गटाची माहिती मिळाली. मग मीही बचतगट काढण्याचा निर्णय घेतला. आमची बंजारा माणसं दिवसभर ढोर मेहनत करुन पैसा कमावतात पण जमा करुन ठेवत नाहीत. कमाई खूप पण दारुत घालविण्याची सवय, हे थांबवून पैसा जमा करण्याची माझी आयडिया मी महिलांना सांगितली. त्यातून भिशी सुरु केली . भिशी परवडना, भांडण होऊ लागली म्हणून ती बंद केली .....
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सेवापूर तांड्यातील पारुबाई राठोड एका दमात हे सगळं सांगत होत्या. सायंकाळचे पाच ते साडेपाच वाजलेले. डोंगरांनी वेढलेल्या या तांड्यावर आम्ही पोहचलो. तांड्याचा रस्ता म्हणजे खूप त्रास होणार अशी माझी धारणा. पण वडवळ नागनाथ गावापासून तांड्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचा अन् उत्तम प्रकारचा. आमची गाडी बघून गावातील पोरं जमा झाली. आमची चौकशी त्यांनी सुरु केली. येण्याचा हेतू सांगताच पारुबाईच्या घरी घेऊन गेली नि पारुबाईशी ओळख करुन दिल्यानंतर त्या बोलू लागल्या.
भिशी बंद केल्यानंतर बचत गट स्थापन करण्याचा आम्ही महिलांनी निर्णय घेतला. सगळ्या जणींनी मिळून ५ हजार रुपये जमा केले. बँकेत गेलो तर मॉनेजरने एवढ्या ४० ते ४५ महिलांचा एक बचत गट करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर १८-१८ महिलांचे दोन बचत गट तयार केले. तांड्यावरच्या बाया एकत्र येऊ लागल्या. आपला आर्थिक व्यवहार चोख ठेवू लागल्या. वायफळ खर्चाला आळा बसू लागला. नवर्याच्या दारुला पैसे देणे बंद झाले. गड्यांना कामांना लावून बायका बॉगा घेऊन हिंडू लागल्या. म्हणून तांड्यावरच्या गड्यामध्ये चर्चा सुरु झाली. घरातील वातावरण तापू लागले. म्हणून चार-पाच महिने बचत गटाचं काम बंद ठेवलं. मध्येच बँकेतून बोलावणे आले. गावातील वातावरणामुळं माझं टेन्शन वाढले. मी आजारी पडले. आपण चांगलं काम करत असल्यानंच आपल्याला नाव ठेवत आहेत, असाही विचार मनात येई. इंदिरा गांधीनांही सुरुवातीला लोकांनी नाव ठेवले असेल की, असंही मनात वाटे. अशातच पुन्हा बचत गटाचं काम सुरु केलं. बँकेनं दोन्ही बचत गटांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं कर्ज दिलं. त्यात दहा हजाराची सबसिडी दिली. आम्ही बायकांनी या पैशातून कोंबड्या, शेळ्या घेतल्या. हे कर्ज वेळेत फेडल्यांनं बँकेने आम्हाला अडीच लाख रुपयांचं कर्ज दिलं. सेवालाल बचत गटाच्या १६ महिलांनी एक एक म्हैस घेतली. अडीच लाख रुपयांवर एक लाख रुपये सबसिडी मिळाली. आता चारा नसल्यानं म्हैशीचं दूध कमी झालयं पण काम करुन बँकेचा नियमित हप्ता आम्ही भरतोय.
आम्हां तांड्यावरच्या बायकांच्या दु:खाला आणि दारिद्र्याला खर्या अर्थानं दारुच जबाबदार असल्याचं मला नेहमी वाटत असे. येथील पुरुष खूप मेहनत करुन पैसा कमावतात आणि रात्री दारु पिऊन ते पैसे दारुत बुडवतात. पुन्हा कर्जबाजारी होतात. त्यातून मुलाचं शिक्षण करत नाहीत. त्यांनाही आपल्या मागे कामाला जुंपतात. गावात येणारी अवैध दारु बंद झाली तर तांड्यावरच्या संसारात सुख शांती येईल, असं वाटू लागलं. माझ्या घरात कोणीही दारु पित नव्हतं. परंतु काही वर्षापूर्वी सेवापूर तांड्यावर धर्मापुरीहून दररोज वाहनातून दारु यायची. त्यामुळं ही दारु वाहतूक बंद करण्याचा मी निर्णय घेतला. तांड्यावरच्या महिलांना सोबत राहण्याची विनंती केली.
एके दिवशी रात्री दीडच्या सुमारास दारु घेऊन जीप आल्याची माहिती मिळताच त्याच रात्री शेजारच्या चार पाच महिलांना झोपेतून उठविलं. सगळ्या महिलांना उठविल्यास कुत्रे चावतील अशी भितीही वाटली. चार पाच महिलांना सोबत घेऊन रोडवर जाऊन जीप पुढे उभे राहिले. जीपवाल्यानं जीप समोर आणून उभी केली. माझा जीव गेला तरी चालेल पण उद्यापासून तुझी जीप दारु घेऊन येणं बंद झाली पाहिजे. असे म्हणून दोन हातात दगड घेऊन तशीच उभी राहिले. इतर महिला बाजूला होत्या. जीपवाल्यानं बाजूनं जोरात जीप काढून नेली. मी जीपवर दोन दगड घातले. जीपच्या काचा फुटल्या. जीप माळाच्या कपारीला धडकली. जीपचालक जीप सोडून पळून गेला. अन् तेव्हापासून तांड्यावरती दारु येणं बंद झालं, आता तांड्यावर कुणी दारु पीत नाही.
बोलता बोलता पारुबाई थांबतात. शेजारी बसलेल्या नातीच्या केसावरुन हात फिरवतात. अंतर्मुख होऊन थोड्या गंभीर होतात. पण आणखी खूप काही करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यातून तरळतो. सायंकाळच्या वातावरणातील गारवा लक्षात घेऊन त्या सुनेला चहा करण्यास सांगतात. दारुबंदी, बचत गट चळवळ यासह कौटुंबिक वाद, विधवांचे प्रश्न, अज्ञानात पिचत पडलेल्या समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पारुबाई राठोड यांनी पुढाकार घेतल्याचे वाचले होते. त्याबद्दल विचारले असता त्या सांगू लागतात. खरं तर मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही मुंबई सोडून सेवापूरला आलो. पण येथे चौथीपर्यंतच शाळा. या पुढच्या शिक्षणासाठी वडवळ नागनाथ या तीन किलोमीटरवरच्या गावी जावे लागते. पण गावाबाहेर जाण्यास रस्ता नव्हता. पावसापाण्यात मुलांना कसे पाठवावे असा प्रश्न पडला. मधे मी गावच्या ग्रामपंचायतीत निवडून आले. जिल्हा परिषदेत प्रयत्न करुन गावचा रस्ता मंजूर करुन घेतला. त्याचं चांगलं काम झालं. त्यामुळे मुलं बाहेरगावी शिक्षणास जाऊ लागली. गावातील शाळेत बायका मुलाना पाठवित नसल्याचं लक्षात येताच बायकांना प्रोत्साहित केलं. मुलांना शाळात पाठविण्याची विनंती केली. शाळा समितीची सदस्य असल्यानं आणखी पुढाकार घेतला. पूर्वी शाळेत केवळ १०-१५ विद्यार्थी असतं. आता ही संख्या ६० ते ६५ वर गेली आहे.
पारुबाई राठोड यांचं शिक्षण झालं नाही. पण नवसाक्षर वर्गातून जाऊन त्या सही करण्यास शिकल्या आहेत. त्यामुळं त्या आज शिक्षण समिती सदस्य , महिला जनसत्ता आंदोलन, पंचायत आघाडीप्रमुख, तंटामुक्त समिती सदस्य, लातूर येथील सावित्रीबाई फुले गायरानधारक बँकेच्या उपाध्यक्षा अशा विविध पदावर यशस्वीपणे काम करीत आहेत. मूळात बचत गटाच्या कामातूनच समाज कार्याची आवड निर्माण झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या बचतगटाच्या कामामुळं सेवापूर तांडा आता सावकाराच्या पाशातून मुक्त झाला आहे. तांड्यावर पैशाची अडचण आल्यास महिला बचत गटातर्फे मदतीचा हात पुढे केला जातो. गावातील रास्त भाव दुकानाचा माल गावात येतच नव्हता. ही बाब ध्यानात येताच दुकानदाराच्या मागे लागून रास्त भाव दुकानदाराचे धान्य आणि इतर साहित्य गावात येऊ लागले.
तांड्यावर सुरक्षा दलाची स्थापना केली. तांड्याचा नियोजनबध्द पध्दतीने विकास करण्याचं काम केले. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, वैद्यकीय अधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून विविध योजना तांड्यावर आणल्या. तांडा सुधार योजनेतून तांड्यावर सिमेंटचे रस्ते तयार केले. पाण्याची व्यवस्था केली. महिलांच्या प्रसुती सुरक्षित व्हाव्यात म्हणून जननी सुरक्षा योजनेत आता प्रत्येक महिलेचे प्रसुती त्या दवाखान्यात करुन घेतात. प्रकाश रेड्डी आणि अरुण रेड्डी यांच्या धरतीबचाव आंदोलनातून खूप काही शिकावयास मिळालं, महिला जनसत्ता आंदोलनातून महिलांच्या हक्काची जाणीव झाली. या व्यासपीठावरुन महाराष्ट्रभर दौरे केले. महिलांच्या मेळाव्यातून भाषणं केली. पुरस्कार मिळाले. शाळेत मुलांच्या नावापुढे वडिलांबरोबरच आईच नाव टाकण्यात पुढाकार घेतला. शेताच्या सातबारा उतार्यावरही महिलांची नाव टाकून घेतली, असं सहजपणानं पारुबाई सांगत होत्या.
'महिला सक्षम झाली तर कुटुंब सुखी होईल' , असं आपणास वाटतय. असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत. पारुबाईंना अलिकडेच लातूर येथील ऊर्जा फाऊंडेशनचा अग्निशिखा पुरस्कार देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप होतं. यापूर्वी त्यांना कुसुमताई चौधरी महिला कल्याण पुरस्कारानंही गौरविण्यात आलं आहे. दर्या कपारीत राहून स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्या पारुबाई ग्रामीण भागातील तमाम महिलांसाठी नक्कीच आदर्श आहेत.
Regards,
Maimarathisanstha.
No comments:
Post a Comment
Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.