सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Saturday, June 27, 2009

नंदगुल तांड्याला लाभला परीसस्पर्श


एक महिला गावाला बदलू शकते, हे तुळजापूर येथील बोरदनवाडीतील इंदुमती राठोड यांना भेटले की पटते. अख्ख्या गावाला ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यापासून गावात स्वच्छतागृहे उभारणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये इंदुमती राठोड यांनी मोलाचा सहभाग दिला आहे.

या गावात गेले, की एकेकाळी हे गाव अस्वच्छ असेल असे वाटत नाही, इतके हे गाव चकाचक झाले आहे. इंदुमती राठोड या बोरदनवाडीतील नंदगुल तांड्यामधील अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. नंदगुल तांड्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. ग्रामपंचायतीचे मन वळवण्यापासून ते गावकऱ्यांना एकजुटीचे महत्त्व समजावून देण्यापर्यंतची कामे त्यांनी केली.

हे गाव रूढार्थाने स्वच्छ नव्हते. या गावात अस्वच्छतेचे साम्राज्य होते. हे गाव अतिशय दुर्गम भागात असून, गावाची लोकसंख्या सुमारे 800 ते 850 आहे. त्यामध्ये सुमारे 200 लोक ऊसतोडणी कामगार असल्यामुळे सहाशे इतकीच गावाची खरी संख्या आहे. या गावातील सुमारे 25 टक्के लोक ऊसतोडणीसाठी जातात. 30 टक्के लोक शेतकरी, तर उरलेले शेतमजूर आहेत.

गावची अस्वच्छता अनेक आजारांना आमंत्रण देणारी असते, त्यामुळे आपले गाव स्वच्छ करण्यासाठी काही पथदर्शक काम करण्याची गरज आहे, असे इंदुमती राठोड यांच्या लक्षात आले आणि तेथून सुरू झाली ती ग्रामस्वच्छतेची प्रक्रिया. कोणतेही मोठे काम ही एकट्यादुकट्याने करण्याची गोष्ट नसते, तसेच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने एखादी गोष्ट केली, तरच त्याचे अपेक्षित पडसाद दिसू शकतात, हे कामाची जुळणी करताना इंदुमती यांच्या लक्षात आले.

तसेच कोणतेही मोठे काम करताना निधीही उपलब्ध असावा लागतो, त्याशिवाय ते काम करता येत नाही. या सगळ्याच गोष्टींसाठी इंदुमती यांनी काम करायला सुरवात केली. त्या निधीसंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पाटील यांना भेटल्या. त्यांच्या कडून ग्रामस्वच्छता कार्यक्रमाची माहिती घेतली. संगीताताईंनी त्यांना ग्रामस्वच्छतेसंदर्भात वर्धा इथे होणाऱ्या अभ्यासदौऱ्यात सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार इंदुमतीताई या दौऱ्यात सहभागी झाल्या.

त्यांना या दौऱ्यामधून खूप शिकायला मिळाले. हा अभ्यासदौरा पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवर ग्रामस्वच्छता कार्यक्रमाची गटप्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. आपले घर, आपले अंगण आपण स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले गावही आपण स्वच्छ ठेवले पाहिजे, अशा शब्दांत गावकऱ्यांना त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायला सुरवात केली.

तसेच घरात शौचालय नसेल, तर गैरसोय तर होतेच, पण असे गावही खूप दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ असते. या परिस्थितीचा त्रास गावकऱ्यांनाच होतो, हेही त्यांनी या वेळी गावकऱ्यांना पटवून सांगितले. ग्रामसभेत हे विषय मांडायला त्यांनी सुरवात केली. सातत्याने ही गोष्ट कानांवर पडून गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी व्हायचे ठरवले. ग्रामस्वच्छता करायची हा निर्णय पक्का झाला, पण ग्रामस्वच्छता म्हणजे नेमकी कृती काय करायची, हा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला.

तो सोडवण्याचे काम इंदुमतीताईंनी केले. त्यांनी ग्रामस्वच्छतेला सुरवात शौचालय बांधणीपासून करायची, असे गावकऱ्यांना सांगितले. हे काम आधी करण्याचे महत्त्वही पटवून दिले. ग्रामसभेत स्वच्छतागृहे असणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले आणि गावात कामाला सुरवात झाली. त्यांनी स्वतः स्वच्छतागृहे उभारणीत पुढाकार घेतला. शौचालयांचे काम गावात सुरू झाले.

एका महत्त्वाच्या वळणावर गाव उभे राहिले, पण गावातील कचऱ्याचा, गटारांचा प्रश्‍नही होताच. केवळ स्वच्छतागृहे उभी करून गावाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न सुटणार नाही, तर त्यासाठी हातात झाडू घेऊन गाव झाडायला हवे. गावातील राडारोडा साफ करायला हवा, उघडी गटारे बुजवायला हवीत आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या हातांना शिस्तीची सवय लावून घ्यायला हवी.

आपल्या हातांना घरातील कचरा, खरकटे जर घराजवळील गटारात फेकायची सवय असली, तर ती आधी मोडायला हवी, हे समजावून सांगितले. त्यांच्या उत्तम भाषणशैलीमुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट गावातील लोकांना पटली. त्या गावात बंजारा लोकांची संख्या अधिक असल्यामुळे गावकऱ्यांशी संवाद साधण्याकरिता त्यांनी बंजारा भाषेतून त्यांच्याशी बोलायला सुरवात केली. त्याचा परिणाम सकारात्मक झाला. गावकरी स्वच्छतेच्या कामाला लागले. ज्या गावात कामाच्या, रोजगाराच्या निमित्ताने एका गावातून दुसऱ्या गावात सतत स्थलांतर करणारे लोक असतात, त्या गावात स्वच्छता आणि शौचायलांची कामे करताना अनेक प्रश्‍न उभे राहतात.

भटक्‍या लोकांना इथे कायमचे राहायचे नसल्याने ते या सर्व उपक्रमात किती भाग घेतील, ही शंका उपस्थित होते. या गावाची परिस्थितीही साधारण तीच होती. तेवढाच प्रश्‍न पैशांचाही होता. गावाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शौचालये बांधायला पैसा कुठून आणणार, हो मोठा प्रश्‍न होता, पण इच्छा असेल तिथे मार्ग निघतो आणि माणसांची मनेही मोठी होतात, या गावातील दहा बचत गट गावाला भक्कम आर्थिक आधार द्यायला पाठीशी ठाम उभे राहिले.

गावातील आर्थिक बळ आणि एकजुटीतून हे गाव हगणदारीमुक्त झाले. त्याचबरोबर गावातील रस्ते स्वच्छ झाले. घाणीचे साम्राज्य नाहीसे झाले. लोकांनी आपल्याला स्वच्छताविषयक चांगल्या सवयी लावून घेतल्या. या सर्वांमागे या गावातील लोकांचा सहभाग मोलाचा आहेच, पण इंदुमती राठोड यांची दूरदृष्टी आणि चिकाटीही तेवढीच मोलाची आहे.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik