सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Monday, October 26, 2009

पारंपरिक गीते, नृत्यावर धरला फेर!


सकाळ वृत्तसेवा
पुसद (जि. यवतमाळ) - निसर्गाशी सख्य असलेल्या बंजारा महिला व तरुणींचा श्रावणातील 'तीज उत्सव' नृत्यांच्या फेरासंगे, पारंपरिक गीतांच्या सुरासंगे रविवारी (ता. 16) उत्साहात साजरा झाला. आनंदाचे उधाण आणणाऱ्या या उत्सवात रममाण झालेल्या तांड्यातील बंजारा अविवाहित तरुणींना विसर्जनाच्या वेळी गहिवरून आले. 
श्रावणात नेहमी खळाळून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना प्रवाहाची धार नसल्याने तीज विसर्जन विहिरीत करावे लागले. बंजारा समाजात श्रावणाची भक्ती मोठी. निसर्गावर प्रेम करणारा बंजारा समाज विविध सण साजरे करताना आनंदाने फुलून येतो. मुला-मुलींमध्ये चैतन्याची सळसळ वाहते, त्यातच बंजारा समाजातील महिला व मुली तीज उत्सव आनंदाने साजरा करतात. गोपालन करणाऱ्या या समाजाचे दैवत श्रीकृष्ण असून त्याची पूजा श्रद्धेने केली जाते.
'तूरे नायका का बे ठोची
नानकीसी झुपडी'
श्रावणात तांड्यातील तरुणी एकत्र जमतात आणि नायकाला तीज पेरण्याची परवानगी मागतात. तांड्यातील नायकाच्या घरी सामूहिकरीत्या टोपल्यांमध्ये गहू पाण्याने भिजवतात. बंजारा महिला छोट्या दुरड्या घेऊन नायकाच्या घरी येतात. तेव्हा नायक प्रत्येकाच्या दुरडीत भिजवलेले गहू टाकतो. हा गहू मुग्यांच्या वारुळातून तरुणींनी आणलेल्या दुरडीतील मातीत टोबतात. त्याआधी बोरीच्या झाडाची पूजा करतात. याला "बोरडी झुबकने' असे म्हणतात. यावेळी महिला व तरुणी 
'हरो हरो जवारा
ये गेहुला डेडरिया
तोन कुणे पेरायो ये 
गेहुला डेडरिया
मन बापू पेरायो'
असे म्हणत अंगणात फेर धरतात व दुरडीतील गव्हाला पाणी घालतात. हा नित्यक्रम दररोज संध्याकाळी दहा दिवस सुरू असतो. नृत्य, गाणी आणि पावसाच्या सरी यांच्यासोबत श्रावणाची खरी मजा तांड्यातील तरुणी लुटतात. तीजच्या विसर्जनाच्या आधी गणगौरची स्थापना करण्यात येते. यात श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मातीच्या मूर्तीची पूजाअर्चा करण्यात येते. या मूर्तीसमोर तांड्यातील सर्व गव्हाच्या दुरड्या ठेवण्यात येतात. हा डंबोळीचा दिवस असून त्या दिवशी प्रसाद वाटण्यात येतो. रात्रीला गावातील अविवाहित तरुणाच्या हातात देवाचा दोना (द्रोणात पेरलेला गहू) देऊन तरुणीच्या घोळक्‍यात त्याला उभे करण्यात येते. यावेळी तरुणी त्याची स्तुती करतात, त्याच्याभोवती 
तोन गामेरो नायक 
करुरे वीर दोना देदर
तोन गामेरो पटल्या 
करूरे वीर दोना देदर
असे म्हणत द्रोणाची मागणी करतात. तरुण द्रोण देण्यास नकार देतो. तसा त्याच्या भोवती तरुणींचा फेर वाढतो, झडप टाकून द्रोण हिसकावण्याचाही प्रयत्न होतो. अखेर निश्‍चय करून तीन-चार तरुणी द्रोण हस्तगत करतातच. यातील आनंद तरुणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो.
मात्र, समारोपाच्या अर्थात विसर्जनाच्या दिवशी शृंगार केलेल्या तरुणींच्या चेहऱ्यांवर तिजेला निरोप देताना वियोगाचे भाव अभावितपणे उमटतात. विसर्जनाला सकाळ ते संध्याकाळपर्यंत श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तिजेच्या दुरड्या ठेवून स्त्रिया आणि तरुणी देवांची गाणी गातात. 
हुँ बाई ये... केरी मंडीचये पाल
हुँ बाई ये... सेवालाललेरी मंडीचये पाल
हुँ बाई ये... पालेम बेठो सेवालाल
हुँ बाई ये... केरो हुबो धोळी धन
या गाण्यावर, डफडीच्या तालावर स्त्रिया व तरुणींचा नृत्याचा फेर रंगात येतो. अखेर टोपलीतील तीज तोडतात व तांड्यातील नायक, कारभारी व असामी यांच्या केसामध्ये तुऱ्यासारखा खोवतात आणि ओसाबोक्‍सी रडू लागतात व स्वत:च्या वेणीत तीज गुंफून घेतात. 
'मारी हुसे मंडेरी तीज
घडी एक रमले दो
मारो बापू पेरायो तीज
घडी एक रमले दो'
असे म्हणत तीज विसर्जित करण्यात येते.
'किमेती आयो वैरी
खाळीयाये सातणून ले चालो' 
अर्थात तीज विसर्जित करावयाच्या नाल्याला उद्देशून म्हटलेले हे गीत यंदा मात्र नाला पाण्याविना कोरडा असल्याने विसर्जन विहिरीत करावे लागले. पुसद शहरात जगदंबा देवी संस्थान परिसरात बंजारा महिला व तरुणींनी तीज उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला. या उत्सवाचे विसर्जन हिंदी साहित्यिक अनिता नाईक यांच्या उपस्थितीत झाले.

No comments:

Post a Comment

Jai sevalal,Gormati.......I think,you want to write something.

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik